रहाटमाळ

फ्रान्सिस दिबेलो
सुवार्ता — जानेवारी २००३, पृ. ४६–४७

शेतीवाडीमध्ये एक जुनी विहीर आहे. एखाद्या लेकरवाळ्या मातेने लाडक्या बाळाला सुरक्षितपणे आपल्या पदराखाली लपवावे तसे नेवर, भेंड आणि फणसाच्या झाडांनी ती विहीर आच्छादिलेली आहे. तिला दृष्ट लागू नये म्हणून ती झाडे प्राणपणाने जपतात.

खूप वर्षांपूर्वी तिथे एक रहाट होता. त्याचा एखाददुसरा अवशेष आता शिल्लक आहे. डोळ्यांना झापड बांधलेल्या बैलांच्या मानेवर जू देऊन त्याला गोलाकार फिरवले जाई. जू आडव्या चाकाला जोडलेले, त्या चाकाला उभे चाक जोडलेले… उभ्या चाकाला आस व आसाला मोठे चक्र आणि त्या चक्राच्या गळ्याला रहाटमाळ जोडलेली…

विश्वचक्राची आठवण करून देणारी ती चक्रे. माणसाने चाकाचा शोध लावला आणि इतिहासाच्या वाटेवरून प्रगती धावू लागली.

रहाट हा गावच्या सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भाग होता. गाव तिथे रहाट हा त्या काळाचा नियम होता. पन्हाळ्यातून वाहणारे पाणी म्हणजे गावाची जीवनरेखा तसेच भाग्यरेखा होती. पाण्याने भरलेला डोह आणि झुळझुळत्या पाण्याचा दांड हेच गावाची खरी श्रीमंती होती. विहिरीच्या काळजातून अखंडपणे वाहणारे निर्झर होते.

गावाची वाडी, जिला भाट म्हटले जात असे, ती स्वभावाने साम्यवादी होती. त्या वाडीत गावातील प्रत्येक कुटुंबाचा जमिनीचा लहानमोठा तुकडा होता. जमिनीच्या हिश्श्याप्रमाणे पाणी उपसण्याचे दिवस ठरलेले होते. त्या दिवसाला ‘वार’ म्हणत असत. ‘वार’ वरून आलेला तो शब्द. काहींचे वारे मोठे, काहींचे लहान इतकाच फरक, ती जुजबी असमानता सर्वांनी स्वीकारलेली होती. केळींच्या बागा हेच मुख्य पीक. पाणी उपसण्यावाचून, कुणाचं कधी भांडण झालेलं माहित नाही… माणसं किती समंजस होती त्यावेळी! वाटून घेण्यासाठी जेव्हा कमी असतं तेव्हा माणसं अधिक समजूतदार असतात का?

चंद्रमाळी छप्पर असलेलं, कुणाचं नसलेलं तरी सगळ्यांचं हक्काचं असलेलं रहाटावरचं ‘खोपटं’ हे सर्वांचं भेटीचं संकेतस्थळ होतं. रजेच्या दिवशी गावकरी मुले रहाटावर भेटत. तिथेच त्यांची शेखर परिषद व्हायची. तिथेच ती आगामी कार्यक्रमाची आखणी व मांडणी करीत. मग कुणाच्या शेतातील शेहाळी चोरणे असो किंवा कुणाच्या बागेतील केळ्या लाटणे असो. गावातील मुलांचं पहिलं संमेलन या विहिरीवर भरत असे. पोहण्याचे पहिले धडे तिथेच गिरवले जात. एखादा शामळू मुलगा अंग चोरून विहिरीच्या काठावर बसून राही. बाकी मुले एकमेकांना खुणावून त्याला उचलून पाण्यात टाकून देत. एकदोनदा खालीवर केल्यावर तोही पोहायला शिके. मे महिन्याची सुटी घालविण्याचे धडे हवेचे ठिकाण म्हणजे गावची विहीर होती.

पावसाळा आला की रहाटाला लागली दोन तीन महिन्यांची एकाकीपणाची रजा मिळे. पुठ्ठ्याचे दोन पायावर डोके झुकवून लवडलेल्या कुत्र्यासमाणे रहाट सुस्तावलेला असे. एखादं अनाम आदिवासी कुळच रहाटाचा आश्रय घेई. बाहेर मुसळधार पावसानं आणि खोदकर वाऱ्यानं धुमाकूळ घातला असताना, चारी बाजूंनी मोकळ्या असलेल्या रहाटावरच्या छताखाली त्यांना घर मिळे. एकट्या, एकाकी रहाटालाही साथ-संगत मिळे.

पावसाळा सरतो. केळींचे बाग सुकतात आणि मग आंबे, मोळ्या, यशवंता, शंकर एकमेकांना साद घालतात… वाळलेल्या केळपानांचे दांड पाण्यात भिजवून, त्याची माळ केली जाते. कुणी माळ तयार करायची, कुणी ती विहिरीवर न्यायची, कुणी ती रहाटावर चढवायची याचे गणित ठरलेले होते. जुनी माळ तुटण्याआधी नवी तयार होत असे. गाव सर्वांचा आणि सर्व गावाचे हे सूत्र विनावाद सर्वांनी स्वीकारले होते. तयार झालेली माळ घेऊन सगळेजण रहाटावर जातात. माळ विहिरीत सोडली जाते. तिच्यावर गाडगी बांधली जातात.

धबक्याच्या खांबावर जू दिले जाते. घर्षणामुळे कोरडी चाके करकरा वाजू लागतात. ती करडईच्या तेलाने माखली जातात… पावसाच्या आगमनापर्यंत रहाटचक्र चालूच राहणार असते…

पूर्वीचं पतिपत्नीचं शृंगारजीवन रहाटाबरोबर जोडलेलं होतं. तेव्हा नववधूवराला चारचौघांसमोर एकमेकांशी बोलण्याची परवानगी नव्हती. बैलाची जोडी हाकीत तो शेतावर निघायचा व त्याच्या मागोमाग डोक्यावर टोपली-फावडे घेऊन खालच्या मानेने ती सुबकित अंत ठेवून चालायची. कुणी कुणाशी बोलायचं नाही, आयुष्याचा प्रवास साथी संगतीने करायचा, पण चारचौघांसमोर एकत्र चालायचं नाही असा अलिखित नियम होता. नववधूवराला एकत्र बोलताना पाहिलं की गावभर बघण्याचा, ‘मुसमुस’, ‘कुजबुजणं’, ‘निलाजरे’ अशी कुजबुज सावळकाया, माळकाया पाणवठ्यावर करीत.

पूर्वीची ती प्रीतीची अबोली, मुख आणि मौन रीत आजही तशीच असावी असा आग्रह कुणी धरणार नाही. परंतु त्या प्रीतीत एक प्रकारची काव्यमयता होती. सूचकता हा कवितेचा विशेष आहे. कविता जितकी सूचक तितकी ती सुंदर असते. प्रीतीचंही तसंच आहे. उघड्याबागड्या वृक्षापेक्षा धुक्यात हरवलेले वृक्ष अधिक विलोभनीय वाटतात. त्या काळी बघू पतिपुढी आली तरी ‘सुहागाच्या रात्रीसाठी’ दोघांना सहा-सहा महिने वाट पाहावी लागत असे… आंबाळ भरणं यायचं आणि बरसण्याची बंदी असायची तसला सगळा प्रकार!

बघूंचं वय पोरेसवदा असल्यामुळे असे केले जात असावे. ‘त्या’ दिवसापर्यंत तिच्या पायात पैजण असत. सुहागाच्या रात्री ते विधीपूर्वक काढून ठेवले जात. पायात अजून पैजण आहेत की नाहीत याकडे खट्याळ मुले नजर ठेवून असत! सारे कसे कलेकलेने घडत असे. उतर रात्रीनंतर झुंजूमुंज, त्यानंतर उष:काल, त्यानंतर पहाट आणि मग लख्ख, संकेचेत सूर्यकिरणांचं आगमन… तेथी सुबकपणे आणि ढगांच्या आडोशाने… त्या संध्याकाळात आणि मध्यरात्रीत एक प्रकारचं पावित्र्य होते. आता रात्र फुटण्यापूर्वीच कधीकधी मध्याह्न होत असते…

रहाटाला लोकसाहित्यात मानाचं स्थान होते. आपण आपल्या हातांनी लावलेल्या बागेला कधी पाणी घातलं हवं याचा हिशेब नववधूंकडे असे. प्रत्यक्ष संवादाला परवानगी नसते म्हणून मग ती गीतातून त्याला सांगायची,

उठ मालक्या सोडला रे।
बैल झुप रे रहाटाला
बैल झुप रे रहाटाला रे।
पाणी जाड दे पाटाला।
पाणी जाड दे पाटाला रे।
तळशीच्या माड्याला रे॥

नवविवाहितांना मनातून तुडुंब जपून असते… आणि मग दोघेही शिवाराच्या वाटेला लागतात. बैल रहाट ओढीत असतो. पाणी पन्हाळ्यातून दांडात व दांडातून ताट्यात जात असतं. ती शेत घालून रहाटावर चुळबुळ करीत बसलेली असते… परंतु तिचं मन बागेत गुंतलेलं असतं… त्याचं गुलाबाचं फूल त्याला अनामिक साद घालीत असतं… परंतु तेथपर्यंत जायचं कसं? कुणी बघितलं तर? अवचित कुणी टपकलं तर? घरी कळलं तर… आणि तरीही अधूनमधून बांध फोडून, नजर चुकवून, पाणी अडखळणे व्हायचं…

वर्षभर अंग झिजवून मेहनत करतानाही हाती फारसं काही पडायचं नाही. तेरात वादळवारे होतेच. शेतावातात निसटलेल्या केळी आडव्या झालेल्या पाहून एकांतात अश्रू ढाळण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रत्येकाच्या पाचपंचवीस केळी उन्मळलेल्या असायच्या. लहानमोठ्या प्रमाणात सगळेच समृद्ध होते, त्यामुळे दुःखाची धार कमी व्हायची. दुःखात भागीदार असले तर माणूस दुःखाचा डोंगरही लिलया झेलू शकतो. वाटून घेतल्याने दुःखभार कमी होतो आणि दिल्याने सुखाची शिदोरी वाढत राहते.

काळचक्र आपल्या गतीने धावत असतं. परिस्थिती पालटत असते. बुका, केतू, चिमा, जांबू, अंतू, शिवा… एकामागून एक निघून गेले… त्यांच्या बिऱ्हाडांनी डोक्यावर पांढरे ‘रुडके’ धारण करून घरातल्या काळोखात स्वतःला गाडून घेतले… एकेमागून एक त्याही अज्ञाताच्या प्रवासाला निघाल्या…

गावात शिक्षणाचा प्रसार झाला. तरुण पोरे शिकू लागली. शहरात नोकऱ्या शोधू लागली… जुने जाणते जमेल तोपर्यंत रहाट चालवू लागले… हळूहळू तेही थकू लागले… नव्या पिढीला शेतीमध्ये स्वारस्य उरलं नाही. कुदळ, फावडं घेऊन शेतात जाणं कर्मकांडाचं वाटू लागलं… जुन्या, नव्या पिढीत खटके उडू लागले. नोकऱ्यांमुळे संसार लहान झाले… शेतीकडे दुर्लक्ष होऊ लागलं.

नव्या पिढीच्या पावलांची दिशा बदलली… ‘भारत’ जायला कुणाला वेळ मिळेनासा झाला. कुणी दुसऱ्याला जमीन कसायला दिली. कुणी खाबर करून पैसे मोकळे केले. बैल विकले गेले… शेती नोकऱ्यांच्या हाती गेली.

हळूहळू रहाट निकामी झाला. चाके एकमेकांत अडकून बसली. आस दगडासारखा जागीच झिजला. गाडव्यांची माळ कुठून गेली. एक दिवस लिलावात रहाटच विकून टाकण्यात आला. डोईत घट्ट बसलेली शिसवाची जुनी लाकडं कोही केल्या हलायला तयार नव्हती. जुन्या माणसांप्रमाणे त्यांनाही मातीची माया सोडवत नव्हती… रहाट मोडला त्या रात्री अंत:करणाने दोन पेग जास्त घेतले. तो ढसढसा रडला…

रहाट गेला. एका चिरंतन संगतीचा अंत झाला. शृंगारमाळा मुक्या झाल्या. चाकांची पिरपिर ऐकू येईनाशी झाली. मडक्यांतून पन्हाळ्यात पडताना नववधूच्या पैजणासारखी होणारी पाण्याची [अस्पष्ट].

शेता तोपर्यंत गाव कसं चेतन्याने सळसळत होतं. रहाट गावाचा गुरु होता. उठ जाणारं देखावं असो किंवा ओकंबोकं जीवघेणं रिकामीपण असो, जीवनात कसं स्थितप्रज्ञ असावं याचे धडे गाव रहाटापासून घेत होता. रहाट गेला. एका युगाचा अंत झाला.

रहाट गेला. रहाटमाळ गेली. रहाटावरची माया गेली… केळींचे बाग ‘उघडले’, शिवारे ओकेबोके झाली. मातीला अवकळा आली. छप्पर विस्कटलं. पिकलेली केळी आणि कोवळी शहाळी याच माळेवर बसून खाल्ली होती… कधी काळोखलेल्या श्रावणाचा चोरटा शृंगार या माळेने डोळे बंद करून पाहिला होता. कधी शाबेळकांनी या रहाटावर अमावास्येच्या रात्री चोरलेल्या धनाच्या वाटण्या केल्या होत्या. थकलेल्या ढवळ्या बैलाचे उसासे याच रहाटाने निमूटपणे काळजात जपून ठेवले होते.

रहाट प्रत्यक्षातून गेला पण तो मनातून जायला तयार नाही. माणसाच्या खोल खोल विहिरीतून रहाटाची किरकिर कानावर पडत आहे. आडातून, विहिरीतून येताना भरलेल्या डुचमळणाऱ्या गाडग्यामडक्यांना काय गव होतं… आखाताच्या नोकरीमुळे एवढी आलेल्या श्रीमंतीचा साज रस्त्याने निघाला, चारचौघांच्या नजरेस पडेल अशा प्रकारे त्याने भिकाऱ्याच्या अंगावर चार नाणी फेकावीत… तशी ती घरलेली नवी मडकी वाटेत, ज्या जलाशयातून सगळो संपत्ती जमविलेली त्या जलाशयाला चार थेंबांचं दान करताना किती खवळखवळ करायची ती गाडगी! ज्यांनी हाडाची काड करून शिकविलं, नोकरी व्यवसायाला लावलं त्या वृद्ध मातापित्यांना पोसण्याचा [अस्पष्ट] आणणाऱ्या उद्धट आधुनिक बाळांसारखी ती गाडगी वाटायची. जे मिळालं आहे ते सर्व दान आहे, असं न मानता ती गाडगी त्या धनाला स्वतःची कमाई समजत होती. वरवर चढण्याच्या गतीत असताना वेळ येताच मिळालेली दौलत त्यांना निमूटपणे पन्हाळ्याच्या स्वाधीन करावी लागे… कंबडी कपदीकरी त्यांच्या जवळ उरत नसे. मग आस्थापूर्वकपणे आणि परभूतपणे माना खाली घालून ती पुन्हा पाण्याकडे भिक्षा मागण्यासाठी निघत… ऐश्वर्य किती क्षणभंगुर असतं ह्याचं थोडंजरी भान ठेवलं तर मान खाली घालण्याची वेळ माणसावर कधी येत नाही.

जे मिळालं आहे ते सगळं दान आहे ही भूमिका असली म्हणजे देतानाही किती कृतार्थ वाटतं… मोकळ्या मनानं सर्वच हक्काचं वाटतं. अशा प्रकारे जे दिलं जातं त्याचं तीर्थ होतं.

जगात सर्वांत सुंदर काय असेल तर ते दान करून रिक्त झालेलं करण्याचे कृतार्थ हात! स्वीकृतीनाथ टागोरांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली होती — माझी [अस्पष्ट]ची यात्रा संपली की तुझ्याकडे येईन. अपेक्षापूर्व अंत:करणाने आणि रिकाम्या हातांनी!

जे जमविलं आहे, जे कमावलं आहे त्याचं तीर्थ वाटून, एक दिवस तुम्हाला आणि मला रिकाम्या हाताने परंतु कृतार्थ मनाने या जगातून निघून जायचं आहे!